नेहरूनगरमध्ये कुर्बानीसाठी विशेष व्यवस्था; पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि कचरा व्यवस्थापनावर प्रशासनाचा भर
पिंपरी-चिंचवड :
आगामी बकरी ईद सण शांततेत आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीला लागली आहे. सणादरम्यान नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत. कुठेही गैरसोय होता कामा नये, अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागांना दिल्या आहेत.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस विभाग आणि विविध मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सणासाठीच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे, पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ, महेंद्र कदम यांनी सहभाग घेतला. तसेच कुरेशी जमात व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधीही उपस्थित होते.
यावेळी उप आयुक्त संदीप खोत यांनी माहिती देताना सांगितले की, मागील वर्षाप्रमाणे यंदाही नेहरूनगर येथील डॉक पॉइंट परिसर कुर्बानीसाठी निश्चित करण्यात आला आहे. या ठिकाणी महापालिकेकडून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
कुर्बानीच्या ठिकाणी पत्राशेड, मंडप आणि पुरेशा पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात राहणार आहे. मोबाईल टॉयलेट व्हॅनची सोय करण्यात येणार आहे. कचरा संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि विशेष पथके कार्यरत राहतील. जनावरांसाठी स्वतंत्र जागा, पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि हौद उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
बैठकीदरम्यान विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. जनावरे बांधण्यासाठी जागा तीन ते चार दिवस आधी उपलब्ध करून द्यावी, पाण्याचा पुरवठा वाढवावा आणि परिसरात सातत्याने स्वच्छता राखावी, अशा सूचना करण्यात आल्या. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील भागांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
