मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा चढला; पिंपरी-चिंचवडकर उकाड्याने हैराण
पुणे :
मे महिन्याच्या उत्तरार्धात पुणे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला. तब्बल ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करत मगरपट्टा परिसर जिल्ह्यात सर्वाधिक तापलेल्या भागांमध्ये अव्वल ठरला. तर पिंपरी-चिंचवड शहरातील डुडुळगाव परिसरानेही उष्णतेचा जोरदार फटका बसल्याचे चित्र दिसून आले. डुडुळगावमध्ये ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हा परिसर जिल्ह्यातील सर्वाधिक तापलेल्या भागांच्या ‘टॉप १०’ यादीत पोहोचला आहे.
पुणे शहरासह उपनगरांमध्ये सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारनंतर उष्णतेची तीव्रता आणखी वाढली. रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसले. अनेकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळले.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, मगरपट्टा परिसरात ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारामतीमध्ये ३८.७ अंश, तर पाषाणमध्ये ३८.५ अंश तापमान नोंदवले गेले. शिवाजीनगर, कोरेगाव पार्क आणि वडगाव शेरी परिसरातही तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले होते.
पिंपरी-चिंचवड शहरात डुडुळगाव सर्वाधिक तापलेल्या भागांमध्ये समोर आले. डुडुळगावमध्ये ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चिंचवडमध्ये ३६.२ अंश तापमान होते. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर तुलनेने कमी गर्दी दिसून आली.
दौंडमध्ये ३७.९ अंश, आंबेगावमध्ये ३७.८ अंश, हवेलीमध्ये ३७.६ अंश आणि लवळेमध्ये ३७ अंश तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे, माळीण परिसर जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाचा भाग ठरला. तेथे ३३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निमगिरीमध्ये ३३.८ अंश, तर बल्लाळवाडीत ३४ अंश तापमान होते.
वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भरपूर पाणी पिणे, ताक, लिंबूपाणी आणि फळांचा रस घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख भागांचे कमाल तापमान
परिसर तापमान
मगरपट्टा ४१.४
बारामती ३८.७
पाषाण ३८.५
शिवाजीनगर ३८.२
कोरेगाव पार्क ३८.१
वडगाव शेरी ३८.०
दौंड ३७.९
आंबेगाव ३७.८
हवेली ३७.६
डुडुळगाव ३७.५
लवळे ३७.०
NDA ३६.७
चिंचवड ३६.२
राजगुरुनगर ३६.१
शिरूर ३५.९
तळेगाव ३५.६
हडपसर ३५.५
नारायणगाव ३५.३
गिरीवण ३५.१
बल्लाळवाडी ३४.०
निमगिरी ३३.८
माळीण ३३.५
