ट्रकच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

​पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – एका भरधाव ट्रकने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीचालक ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २० मे) रोजी रात्री नऊच्या सुमारास स्पाईन रोडवरील कलावंतीन महालमाता सर्व्हिसिंग सेंटरच्या समोर घडली आहे.
उत्‍तम रणपिसे असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. याबाबत त्‍यांचा मुलगा प्रशांत उत्तम रणपिसे (वय ३५, रा. बिल्डींग नं. डी २०, फ्लॅट नं ५०३, शिवमुद्रा हाऊसिंग सोसायटी, घरकुल-चिखली, पुणे) यांनी गुरुवारी (दि. २१ मे) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. किशोर हरीचंद्र जाधव (वय ५०, रा. एस.एम. अॅटोलिमिटेड, नाणेकरवाडी, चाकण, पुणे. मूळ गाव- रा. नाजरे सुपे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपीच ट्रक चालकाचे नाव आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास आरोपी किशोर जाधव याने आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक (MH 14 JL 5733) वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे चालवला. त्याने उत्तम रणपिसे यांच्या स्कुटीला उजव्या बाजूने जोरात धडक दिली. धडकेमुळे उत्तम रणपिसे हे स्कुटीसह रस्त्यावर कोसळले. याच वेळी ट्रकचे डाव्या बाजूचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ​ठाण्‍यातील उपनिरीक्षक मणेर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *