पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – संत तुकारामनगर येथील म्हाडाचे रो-हाउस स्वस्तात खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची ७४ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना मार्च २०२४ ते २१ मे २०२६ दरम्यान संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप मारुती गोपलघरे (रा. कोथरुड, पुणे), गोकुळ नामदेव माहिते (रा. आंबेगावखुर्द, मारुती मंदिराजवळ, तांबुळवाडी रोड, पुणे), निखील अंबाजी पवार (वय ३५, रा. २६७/२, खराळवाडी, पिंपरी) आणि कुलदीप सिंग मोहिंदर सिंग एधी (वय ५६, रा. ४५५/२५३१, संततुकारामनगर, पिंपरी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुनम रामप्रसाद शर्मा (वय ४४, रा. १९७/९५०, संततुकारामनगर, पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. २१ मे) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपलघरे मोहिते आणि पवार यांनी आपसांत संगनमत करून फिर्यादी पुनम शर्मा आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. संत तुकारामनगर येथील ययाती गल्ली नंबर १ मधील म्हाडाचे १४ नंबरचे रो-हाउस तुम्हाला खरेदी करून देतो, असे खोटे आश्वासन आरोपींनी दिले. हा विश्वास दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या वेळी फिर्यादींकडून रोख (कॅश) आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ७४ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही घर न देता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक पांडे अधिक तपास करीत आहेत.
म्हाडाचे रो-हाउस देण्याच्या बहाण्याने ७४ लाखांची फसवणूक
