पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शस्त्र बाळगण्यास सक्त मनाई आदेश लागू असताना, हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात धारदार लोखंडी सत्तुर घेऊन फिरणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मोहसीन समीर सय्यद (वय २५, रा. रूम नं. २१, पपया चाळ, खराळवाडी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अक्षय शिवाजी साळुंखे यांनी गुरुवारी (दि. २१ मे) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त यांनी शहरात १३ मे २०२६ ते २६ मे २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई करणारा कायदेशीर आदेश जारी केला आहे. असे असतानाही आरोपी मोहसीन सय्यद हा हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीच्या मोकळ्या मैदानात धारदार लोखंडी सत्तुर कमरेला बाळगून फिरत होता. कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो तेथे थांबला असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बोकड करीत आहेत.
पिंपरीत धारदार सत्तुरसह तरुण जेरबंद
