अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; १ किलोहून अधिक गांजासह तस्कर जेरबंद

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – चाकण ते वोक्सवॅगन रस्त्यावरील निघोजे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्‍या एका धडक कारवाईत बेकायदेशीररीत्या गांजा विक्री करणाऱ्या एका तस्कराला रंगेहात अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १ किलो १९६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी दुपारी तीन वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
संभाजी विठ्ठल मात्रे (वय ३८, रा. जगदंब हॉटेलच्या पाठीमागे, डोंगरवस्ती, ता. खेड, जि. पुणे; मूळ पत्ता मु.पो. चिंचवण, ता. वडवणी, जि. बीड) असे गुन्‍हा दाखल केल्‍यानंतर अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई रणधिर रमेश माने यांनी शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी दुपारी १५.०७ वाजेच्या सुमारास दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्पायसर चौक ते वोक्सवॅगन रोड लगत असलेल्या जगदंब हॉटेल समोर, डोंगरवस्ती (निघोजे, पुणे) येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी संभाजी मात्रे हा गांजा या अंमली पदार्थाची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी तिथे थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ११९६ ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक मोबाइल हँडसेट असा एकूण ६९ हजार ८०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पिंजारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *