तरुणाला लाकडी दांडके, दगडाने मारहाण; तिघांना अटक

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – “मी साईनगरचा भाई आहे, इथे राहायचे असेल तर इज्जतीत राहा,” अशी धमकी देत एका तरुणाला आणि त्याच्या आईला धक्काबुक्की केली. तसेच दगड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गहुंजे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून परिसरातील नागरिक या गुंडांच्या दहशतीमुळे सैरावैरा पळाले. ही घटना गुरुवारी (दि. २१ मे) रोजी मावळ तालुक्‍यातील गहुंजे येथील साईनगर परिसरात सायंकाळी सव्‍वा पाच वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​याप्रकरणी पोलिसांनी नागेश जगले (वय २७), अभिषेक जगले (वय २५) आणि योगेश दडस (वय २५, सर्व रा. गल्ली नं. ३, निसर्ग दर्शन सोसायटी, साईनगर, ता. मावळ, जि. पुणे) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करीत त्‍यांना अटक केली आहे. प्रेमराज केशव सोळंकी (वय २८, रा. फ्लॅट ३०६, साई रेसिडेन्सी, साईनगर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे; मूळ गाव पुराबाईखेडा, ता. बैयाना, जि. भरतपूर, राज्य राजस्थान) असे हल्‍ल्‍यात गंभीर जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २१ मे) रोजी सायंकाळी सव्‍वा पाच वाजेच्या सुमारास मावळ तालुक्‍यातील गहुंजे येथील साई रेसिडेन्सीसमोरील मैदानावर फिर्यादी उभे होते. तिथे राहणारा आरोपी नागेश जगले तिथे आला आणि “इथे कोणी थांबू नका, मैदान खाली करा,” असे म्हणून शिवीगाळ करू लागला. फिर्यादीने विचारणा केली असता नागेशने धक्काबुक्की करत स्वतःला ‘भाई’ म्हणवून घेतले आणि लाकडी दांडके हवेत फिरवून दहशत माजवली. त्याचे साथीदार अभिषेक आणि योगेश यांनी फिर्यादी सोळंकी यांच्‍यावर दगडफेक केली, ज्यामुळे मैदानातील लोक भितीने पळून गेले. नागेशने फिर्यादीच्या पाठीवर आणि डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला, तसेच नखाने ओरखडले. फिर्यादीच्या आईला देखील आरोपींनी धक्काबुक्की केली. त्‍यानंतर फिर्यादी यांच्‍या घरी येऊन घराचे गेट तोडून नुकसान केले. ​या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *