घरातून दागिने गायब झाल्याचेच नव्हते लक्षात; शेजाऱ्यानेच साधली संधी, १८ लाखांचे साडे बावीस तोळे सोने लंपास
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – ताथवडे येथील पवार वस्ती परिसरात घडलेल्या तब्बल साडे बावीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, घरातून दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादींनाच माहिती नव्हते. दागिने नेमके कुठे ठेवले याबाबत संभ्रम असतानाच नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आणि त्यातून ताथवड्यातील ही चोरी उघडकीस आली. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ११ मे ते २० मे दरम्यान घडली.
या प्रकरणी वाकड पोलिसांनी सचिन भगवान सहजराव (वय ४३, रा. पवार वस्ती, ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुखदेव दिनकर पवार (वय ५४, रा. सर्वे नं. १४२/२, नवले पेट्रोल पंपासमोर, पवार वस्ती, ताथवडे) यांनी शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ मे २०२६ रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते दि. २० मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरीची ही घटना घडली. फिर्यादी यांच्या घराचे दार उघडे असल्याची संधी साधून आरोपी सचिन सहजराव याने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले तब्बल १८ लाख रुपये किमतीचे सुमारे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादी सुखदेव पवार यांना सुरुवातीला समजलेच नव्हते. दागिने नेमके कुठे ठेवले याबाबत त्यांच्यात संभ्रम होता. दरम्यान, नाशिक पोलिसांनी आरोपी सचिन सहजराव याला अन्य एका प्रकरणात अटक केली. चौकशीदरम्यान ताथवडे येथील चोरीची माहिती समोर आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी फिर्यादींना संपर्क साधून चोरीबाबत माहिती दिली. मात्र, आरोपी नेमक्या कोणत्या गुन्ह्यात नाशिक पोलीसांच्या ताब्यात गेला होता, याची माहिती मिळू शकली नाही.
विशेष म्हणजे आरोपी सचिन सहजराव हा फिर्यादींच्या शेजारीच राहत होता. घरातील हालचालींची माहिती असल्याने त्याने संधी साधत घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक अंबरीश देशमुख करीत आहेत.
नाशिक पोलीसांच्या कारवाईत उघड झाला ताथवड्यातील सोन्याच्या दागिन्यांचे गूढ चोरीप्रकरण!
