पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाडलेल्या घरावर बेकायदेशीरपणे ताडपत्री टाकणाऱ्या आरोपींना हटकले असता, त्यांनी एका महिलेचा हात पिरगळून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (२० मे) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास दळवीनगर, चिंचवड येथे घडली.
कविता पंढरीनाथ दळवी (५१, दळवीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य जगदीश शिंदे (१९), मनोज विठ्ठल शिंदे (४२) आणि रत्नमाला विठ्ठल शिंदे (६५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीच्या मालकीच्या जागेवरील पाडलेल्या घराच्या पडझडीवर आरोपी ताडपत्री टाकत होते. फिर्यादी यांनी त्याबाबत विचारणा केली असता आरोपी त्यांच्या अंगावर धावून आले. आदित्य याने फिर्यादीचा उजवा हात जोरात ओढून पिरगळल्यामुळे त्यांच्या मनगटाला सुज आली व दुखापत झाली. मनोज याने फिर्यादी आणि त्याच्या मुलाला बघून घेण्याची धमकी दिली. फिर्यादीला शिवीगाळ व धक्काबुक्की करत हाताने मारहाण केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
