उसने दिलेले पैसे मागितल्याने मारहाण

उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या तरुणाला आणि त्याच्या मित्रांना तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच रॉडने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (२२ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथील महादेव मंदिराजवळ घडली.

प्रवीण नानासाहेब वाघमारे (३८, अजंठानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन कानगुडे (३०, मोरेवस्ती, चिखली, पुणे), प्रवीण कानगुडे (२८, मोरेवस्ती, चिखली, पुणे) आणि जिजाबाई उगले (३०, मोरेवस्ती, चिखली, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र अशोक कदम व गणेश चंदनशिवे हे आरोपी नितीन याच्याकडे अशोकने उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिन्ही आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणी दरम्यान महिला आरोपीने फिर्यादीच्या मानेवर नखांनी ओरखडले, तर नितीन याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *