आळंदी येथील प्रसिद्ध ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दानपेटीतील पैसे काढून ते कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी असलेल्या एका सेवकानेच मंदिरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १२ मे, १३ मे आणि १६ मे २०२६ या तीन दिवशी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात घडली.
या प्रकरणात ज्ञानेश्वर महादेव वीर (४९, आळंदी देवाची, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंदिरातील सेवक आरोपी विशाल बाळ वारुळे (३३, चोविसावाडी, हवेली, पुणे; मूळ गाव- वारुळवाडी, नारायणगाव, जुन्नर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मंदिरात सेवक म्हणून काम करत होता आणि त्याच्यावर विश्वासाने दानपेटीतील पैसे काढून कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी दिली होती. त्याने दानपेटीतील पैसे बादलीत भरताना नजर चुकवून ते पोत्यात भरले, त्यावर ट्रे ठेवून ते पैसे कॅशियर रूममध्ये नेले आणि कपाटाच्या मागे लपवून ठेवले. त्यानंतर त्यावर मंदिरातील फुलांचे हार ठेवून कॅशियर महेश गोपाळ गोखले यांना ‘मी हार घेऊन जातो आहे’ असे भासवत तीन दिवसांत प्रत्येकी ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
