(pimpri chinchwad)-शहराच्या कमाल तापमानात मोठी घट; उकाड्याने होरपळलेल्या शहराला मोठा दिलासा*
*अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम*
*पिंपरी-चिंचवड ः*
यंदाच्या उन्हाळ्यात ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून नागरिकांना अक्षरशः हैराण करणाऱ्या चिंचवडच्या तापमानात आता मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि बदललेल्या हवामानामुळे चिंचवडचे कमाल तापमान थेट ३४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच शहराच्या कमाल तापमानात तब्बल ७.४ अंशांची लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात तीव्र उष्णतेची लाट जाणवत होती. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत होते. घराबाहेर पडणे कठीण बनले होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, कामगार आणि दुचाकीस्वार उकाड्याने हैराण झाले होते. दुपारच्या वेळेत अनेक भागांमध्ये उष्ण वारे वाहत होते. मात्र, अचानक बदललेल्या हवामानामुळे आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
सध्या सकाळ आणि सायंकाळच्या वेळी हवेत थंडावा जाणवत आहे. उद्याने, मैदानं आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी दुपारी शुकशुकाट असलेले रस्ते आता तुलनेने गजबजू लागले आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्याने पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे तापमानात ही मोठी घट झाली आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही भागांत हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना उकाड्यापासून आणखी काही दिवस दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
