​महागाईचा तिहेरी फटका! इंधन-तेलानंतर आता दुधानेही काढले पुणेकरांचे ‘दूधाचे दूध’ ​चितळे आणि गोकुळच्या दरवाढीने सर्वसामान्य हैराण; चहा, नाश्ता आणि स्वयंपाकघराचे गणित बिघडले

​पुणे, दि. २४ (प्रतिनिधी)
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी आधीच त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता दुधानेही मोठा झटका दिला आहे. इंधन दरवाढीनंतर खाद्यतेलाचे दर भडकले असतानाच आता नामांकित दूध ब्रँड्सनीही दरवाढ जाहीर केली आहे. ‘चितळे’ आणि ‘गोकुळ’ या दोन्ही कंपन्यांनी गाईच्या दुधाच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ केली असून त्यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट पुन्हा कोलमडले आहे.
​नव्या दरानुसार चितळे गाईचे दूध आता 62 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाणार आहे. तर गोकुळ गाईच्या दुधाचा दर ६० रुपये प्रतिलिटर झाला आहे. रोजच्या वापरातील महत्त्वाचा घटक असलेल्या दुधाच्या दरवाढीमुळे गृहिणी, नोकरदार आणि कामगार वर्ग चिंतेत सापडला आहे.
​इंधन दरवाढीचा थेट परिणाम
​गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग वाढ झाली आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे बाजारात जीवनावश्यक वस्तूंचे भाव चढू लागले आहेत. आधीच खाद्यतेलाच्या १५ लिटरच्या डब्यामागे ७० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आता दूध महागल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरील ताण आणखी वाढला आहे.
​शहरातील किराणा दुकानदारांच्या मते, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे अनेक कंपन्या दरवाढीच्या तयारीत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत इतर दुग्धजन्य पदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
​चहा-नाश्त्याचे गणित बिघडले
​दररोज सकाळ-संध्याकाळ वापरल्या जाणाऱ्या दुधाच्या किमती वाढल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांचे गणित बिघडले आहे. मुलांचे दूध, चहा, कॉफी आणि दुग्धजन्य पदार्थांचा खर्च वाढल्याने गृहिणींमध्ये नाराजी आहे.
​“आधीच भाजीपाला, गॅस, तेल आणि किराण्याचे दर वाढले आहेत. आता दुधानेही कंबरडे मोडले,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
​वाहतूकदारांच्या भाडेवाढीचाही फटका
​इंधन दरवाढीचा आधार घेत काही वाहतूकदारांनी मालवाहतुकीचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी बाजारात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा खर्च वाढत आहे. मर्यादित उत्पन्न आणि वाढती महागाई यामुळे कामगार वर्ग आणि नोकरदार कुटुंबे आर्थिक विवंचनेत सापडली आहेत.
​महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *