पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत २७ हजार ४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (दि. २५ मे) रोजी सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास वाकड येथील कस्पटे चौकाजवळ मुळा नदीवरील अर्धवट पुलावर करण्यात आली.
कमलेश भगवान ससाणे (वय ३५, रा. बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे) याला अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरे (वय ४६) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे चौक परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून ५.४८ ग्रॅम एमडी पावडर, प्लास्टिक पिशव्या, चमचा आणि मोबाइल असा ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत.
कस्पटे चौकात एमडी ड्रग्जसह तस्कर जेरबंद
