रस्त्यांवरील ७३९ बेवारस वाहनांचा ‘ई-लिलाव’; ५० लाखांहून अधिकचा महसूल जमा
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने विशेष मोहीम यशस्वी
रस्त्यांवरील बेवारस वाहनांची माहिती ‘PTP App’ द्वारे देण्याचे वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन
पुणे :
पुणे शहरातील रस्त्यांची कोंडी फोडण्यासाठी आणि वर्षानुवर्षे पडून असलेल्या ‘बिनधनी’ वाहनांचा प्रश्न मिटवण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. शहरातील विविध रस्ते आणि पोलीस ठाण्यांच्या आवारात धूळ खात पडलेल्या तब्बल ७३९ बेवारस वाहनांचा जाहीर ‘ई-लिलाव’ करण्यात आला आहे. या लिलावाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत तब्बल ५० लाख १० हजार १२८ रुपये इतकी रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
…आणि आयुक्तांच्या आदेशाने मोहीम फत्ते झाली!
पुणे शहरात अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या कडेला शेकडो वाहने बेवारस स्थितीत पडून होती. यामुळे केवळ वाहतुकीलाच अडथळा ठरत नव्हता, तर नागरिकांना चालणेही कठीण झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बेवारस वाहनांची कायदेशीर विल्हेवाट लावण्याचे थेट आदेश दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेने परिमंडळ अंतर्गत ११ पोलीस ठाण्यांमधील ३६६ आणि वाहतूक शाखेच्या हद्दीतील ३७३ अशा एकूण ७३९ वाहनांना जप्त करून ही विशेष मोहीम राबवली.
अशी झाली संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया:
मालकांचा शोध: जप्त केलेल्या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहीरनामे व प्रसिद्धी देण्यात आली. ज्या वाहनांचे मालक मिळून आले, त्यांना त्यांची वाहने परत करण्यात आली.
RTO कडून मूल्यांकन: मालक न मिळालेल्या वाहनांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) अधिकृत मूल्यांकन करण्यात आले.
न्यायालयाची मंजुरी: ज्या वाहनांचे दावेदार आले नाहीत, त्याबाबत न्यायालयाकडून विल्हेवाट लावण्याचे आदेश मिळवण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८७ अन्वये या लिलावाला अंतिम मंजुरी देण्यात आली.
पारदर्शक ई-लिलाव: केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या ‘मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड’ (MSTC) या संस्थेमार्फत २० मे रोजी अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही ई-लिलाव प्रक्रिया पार पडली.
नागरिकांनो, ‘पी.टी.पी ॲप’वर द्या बेवारस वाहनांची माहिती!
”या मोहिमेमुळे शहरातील बेवारस वाहनांची समस्या अंशतः कमी झाली असून, यापुढेही वाहतूक विभाग अशी कारवाई सुरूच ठेवणार आहे. नागरिकांना आपल्या परिसरात किंवा रस्त्यावर बऱ्याच काळापासून पडून असलेली, वाहतुकीस अडथळा ठरणारी बेवारस वाहने आढळल्यास, त्यांनी त्याची माहिती तात्काळ PTP (Pune Traffic Police) ॲप द्वारे वाहतूक विभागाला द्यावी. पुणे शहर अडथळेमुक्त, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.”
— डॉ. संदीप भाजीभाकरे (पोलीस उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा)
सांघिक प्रयत्नांना यश
ही भव्य मोहीम यशस्वी करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांच्या अंमलदारांनी मोलाचे योगदान दिले आहे. या धडक कारवाईमुळे पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला असून रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
