दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला कर्मचार्‍याचा मृत्यू

पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – नोव्हेल स्कूलजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणार्‍या 79 वर्षीय वृद्ध महिलेला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना 13 मे रोजी घडली.
गोविंद दत्तात्रय म्हस्के (वय 25, रा. गोगलगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपक रवि जोगदंड (वय 20, रा. पत्राशेड, अजिंठानगर, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 27 मे) रोजी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आजी मनुबाई प्रल्हाद साकळे (वय 79) या रस्त्यावरील दुभाजकातील झाडांना पाणी घालण्याचे काम करत होत्या. त्या जेवणाचा डबा घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना, थरमॅक्स चौकाकडून आलेल्या आरोपीच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मनुबाई यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *