निगडी येथे मेट्रो कामादरम्यान पाणी पाइपलाइन फुटली; हजारो लिटर पाणी वाया

निगडी येथे मेट्रो कामादरम्यान पाणी पाइपलाइन फुटली; हजारो लिटर पाणी वाया
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान जेसीबी मशीनने खोदकाम करताना पाणी पुरवठ्याची मुख्य पाइपलाइन फुटल्याची घटना घडली. ही घटना भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण, मुंबई-पुणे महामार्ग परिसरात घडली. पाइपलाइन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले असून परिसरातील पाणीपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला होता.
या घटनेमुळे निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर आदी भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, निगडी ते पिंपरीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान अशा प्रकारे पाइपलाइन फुटण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाची पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन संबंधित मेट्रो ठेकेदाराविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *