पिंपळे सौदागर परिसरातील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रोडवरील ‘टेस्ट ऑफ इंदौर’ या ठिकाणच्या गोडाऊन व कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग इतकी भीषण होती की काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरातील नागरिकांची पळापळ सुरू झाली.
सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, रहदारीच्या ठिकाणी अशा प्रकारे गोडाऊन व कारखाना सुरू ठेवण्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी तब्बल १५ गॅस सिलिंडर आढळून आल्याने प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पिंपळे सौदागर परिसरातील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रोडवरील ‘टेस्ट ऑफ इंदौर’ या ठिकाणच्या गोडाऊन व कारखान्यात भीषण आग
