पिंपरी चिंचवड मधील दापोडी परिसरातील कथित विषारी आणि गावठी दारू प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाने कठोर भूमिका घेत मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. पुण्यातील कारवाईनंतर आता पिंपरी-चिंचवड पोलिस दलातही निष्काळजी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.
फुगेवाडी परिसरात घडलेल्या या प्रकरणात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे आणि पर्यवेक्षणातील त्रुटींमुळे बेकायदेशीर दारू विक्रीला आळा बसला नाही, असे प्राथमिक चौकशीत समोर आले. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
या कारवाईमध्ये विजय वाघमारे, तपास पथकाचे प्रमुख फौजदार राजू भास्कर यांच्यासह जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव आणि विशाल काळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली.
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ तसेच मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन कायम राहणार असून, संबंधितांना मुख्यालय सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच दररोज पुणे शहर नियंत्रण कक्षात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
फुगेवाडी विषारी दारू प्रकरणी पुण्यापाठोपाठ, पिंपरी चिंचवड पोलिसांवरहि कारवाईचा बडगा, दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचारी निलंबीत
