महागड्या सोन्याला किफायतशीर पर्याय; लग्नसराईपूर्वी सराफा बाजारात वाढली ग्राहकांची गर्दी
पिंपरी-चिंचवड :
सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पारंपरिक सोन्याचे दागिने खरेदी करणे अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील महिलांचा कल ‘वन ग्रॅम ज्वेलरी’कडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी खर्च, आकर्षक डिझाईन्स आणि सुरक्षित वापर यामुळे या दागिन्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून शहरातील सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
गेल्या काही महिन्यांत सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे अनेकांनी खऱ्या सोन्याच्या खरेदीऐवजी वन ग्रॅम ज्वेलरीचा पर्याय स्वीकारला आहे. विशेष म्हणजे हे दागिने केवळ लग्नसमारंभ किंवा सणांसाठीच नव्हे, तर दैनंदिन वापरासाठीही पसंत केले जात आहेत. नोकरदार महिला, महाविद्यालयीन तरुणी आणि गृहिणी यांच्याकडून या दागिन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वन ग्रॅम ज्वेलरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कमी किंमतीत मिळणारा सोन्यासारखा आकर्षक लूक. हे दागिने वजनाने हलके असतात. त्यामुळे दिवसभर वापरणे सोयीचे ठरते. गर्दीच्या ठिकाणी चोरी किंवा हरवण्याची भीतीही तुलनेने कमी असते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनेक महिला या पर्यायाला प्राधान्य देत आहेत.
शहरातील सराफा बाजारात सध्या पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत. गंठण, नेकलेस, राणीहार, पुतळीहार, टेंपल ज्वेलरी, मिनी गंठण, बांगड्या, बाजूबंद, अंगठ्या, चैन, मेखला, नथ तसेच कानातील विविध प्रकारच्या कुड्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. या दागिन्यांवरील सूक्ष्म कलाकुसर आणि फिनिशिंगमुळे ते खऱ्या सोन्याच्या दागिन्यांसारखेच दिसतात.
दरांच्या बाबतीतही वन ग्रॅम ज्वेलरी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. कानातील कुड्या सुमारे ६०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. नथ ७९५ रुपयांपासून मिळते. अंगठ्यांची किंमत २०० रुपयांपासून सुरू होते. चैन १,४०० ते २,५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. मिनी गंठण १,५०० रुपयांपासून तर नेकलेस सुमारे २,२०० रुपयांपासून मिळतात. बांगड्या आणि गंठण २,२०० रुपयांपासून उपलब्ध असून हार, मेखला आणि इतर पारंपरिक दागिन्यांच्या किंमतीही तुलनेने परवडणाऱ्या आहेत.
आगामी लग्नसराई, सण-उत्सव आणि कौटुंबिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वन ग्रॅम ज्वेलरीची मागणी आणखी वाढण्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. महागाईच्या काळात आकर्षक, सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय म्हणून वन ग्रॅम ज्वेलरीने महिलांच्या पसंतीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सराफा बाजारात या दागिन्यांची विक्री सध्या तेजीत असल्याचे चित्र आहे.
