फुगेवाडीतील घातक मिश्रणाने उध्वस्त केली अनेक कुटुंबे; विषारी दारूकांडाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड
पिंपरी-चिंचवड :
अवघ्या सहा हजार ६०० रुपयांच्या नफ्यासाठी १८ निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव फुगेवाडी विषारी दारूकांडाच्या तपासातून समोर आले आहे. अधिक पैसे कमावण्याच्या हव्यासातून घातक रसायनांची भेसळ करण्यात आली. त्यातून अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पुरवठा साखळी आणि आरोपींची भूमिका उघड होताच तपास यंत्रणांनाही धक्का बसला आहे.
पोलीस तपासात मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्याविरोधात गंभीर माहिती समोर आली आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी त्याने दारूमध्ये मिथेनॉलसारखे घातक रसायन मिसळल्याचा आरोप आहे. ९ मे रोजी त्याने सुमारे १७ हजार ५०० रुपयांना २१० लिटर मिथेनॉल खरेदी केले. त्यानंतर २३ मे रोजी भेसळीचा डाव रचण्यात आला.
उरळी कांचन परिसरातून गावठी दारूचे पाच ड्रम आणण्यात आले. या दारूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि मिथेनॉल मिसळण्यात आले. त्यामुळे तयार साठ्याचे प्रमाण वाढविण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे २७ हजार रुपयांचा खर्च झाला. नंतर हा साठा ३३ हजार ६०० रुपयांना विकण्यात आला. या व्यवहारातून आरोपींना केवळ सहा हजार ६०० रुपयांचा फायदा झाला. मात्र या अल्प नफ्यासाठी १८ जणांना जीव गमवावा लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फुगेवाडी परिसर तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच भागात घातक मिश्रण तयार करण्यात आल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. काही आरोपींनी आपल्या निवासस्थानीच रासायनिक मिश्रण तयार केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. त्यानंतर हा साठा विविध भागांत पाठविण्यात आला.
या प्रकरणातील पुरवठा साखळीही तपासात उघड झाली आहे. गावठी दारूची निर्मिती, खरेदी, भेसळ आणि विक्री अशा अनेक टप्प्यांतून हे जाळे कार्यरत होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्ये हा साठा पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती अपेक्षेपेक्षा मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मिथेनॉल हे अत्यंत घातक रसायन आहे. शरीरात गेल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होतात. सुरुवातीला मळमळ, उलट्या आणि चक्कर येते. श्वास घेण्यास त्रास होतो. त्यानंतर डोळ्यांच्या नसांवर परिणाम होतो. यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढवू शकतो.
दरम्यान, या प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. संशयित ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. मृत्यूकांडामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
