​रावेतमध्ये महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला भीषण आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, जनावरांची सुटका!

​रावेत :
येथील मळेकर वस्ती परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास महावितरणच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एका गोठ्याला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, अग्निशमन दलाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे गोठ्यातील जनावरांची जीवितहानी टळली असून मोठा अनर्थ टळला आहे.

​महावितरणचे शॉर्ट सर्किट आणि आगीचा भडका
​ अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील मळेकर वस्ती परिसरातून जाणाऱ्या महावितरणच्या विद्युत वाहिनीत अचानक तांत्रिक बिघाड होऊन जोरदार शॉर्ट सर्किट झाले. या शॉर्ट सर्किटमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्याने अचानक पेट घेतला. गोठ्यात सुके गवत व इतर साहित्य असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ आणि धुराचे साम्राज्य पाहून परिसरात एकच खळबळबळ उडाली.

​जनावरांची सुदैवाने सुटका; काहींवर उपचार सुरू
​आग लागली तेव्हा गोठ्यात दुभती जनावरे बांधलेली होती. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी आणि मालकाने तात्काळ धावपळ करत जनावरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने, वेळेत हालचाल केल्यामुळे कोणत्याही जनावराचा होरपळून मृत्यू झाला नाही. मात्र, या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने काही जनावरे किरकोळ व गंभीररीत्या भाजली आहेत. जखमी जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तातधीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

​अग्निशमन दलाची ‘अॅक्शन मोड’मध्ये कारवाई
​घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची दोन अग्निशामक वाहने (बंब) जवानांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. गोठ्याला चौफेर वेढलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक जवानांनी पाण्याचा मारा करत शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
​जवानांनी जिवाची पर्वा न करता काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि कुलिंग ऑपरेशन पूर्ण केले. जवानांच्या या कामगिरीमुळे आग शेजारील निवासी भागापर्यंत पोहोचण्याआधीच रोखण्यात यश आले, ज्यामुळे पुढील मोठा धोका टळला.

​आर्थिक नुकसान मोठे
​अग्निशमन दलाने आग विझवली असली, तरी तोपर्यंत गोठ्याचे छप्पर, साठवून ठेवलेला चारा आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार यात मळेकर वस्तीतील गोठा मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या शेवटी आणि मान्सूनच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, तसेच महावितरणच्या तारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *