आकुर्डीतील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील १२ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई

पिंपरी, दि. ३ जून २०२६ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील सर्वे क्रमांक ७/१/१ब, आकुर्डी येथील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील अनधिकृत आरसीसी बांधकामे व पत्राशेड यांच्यावर आज निष्कासन कारवाई करण्यात आली.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कारवाई पथकामार्फत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत हॉटेल मॅजेस्टिक तसेच परिसरातील अनधिकृत आरसीसी बांधकामे व पत्राशेड हटविण्यात आले. या कारवाईमध्ये एकूण सुमारे १२ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

सदर कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.

या कारवाईमध्ये प्रशासन अधिकारी प्रिया गोरखे, बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह उपअभियंते, कनिष्ठ अभियंते तसेच ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सहभागी होते. याशिवाय निगडी पोलीस ठाण्याचे २० पोलीस कर्मचारी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील २० कर्मचारी, ‘अ’, ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतील महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, महापालिका मजूर यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेसाठी ३ जेसीबी, १ पोकलेन यंत्र, १५ मजुर तसेच आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामांचे निष्कासन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

कोट
पिंपरी चिंचवड शहराच्या नियोजित आणि शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामांवर प्रभावी कारवाई करणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय उभारण्यात आलेली बांधकामे नियमबाह्य असून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहराच्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. नागरिकांनी बांधकाम करताना सर्व आवश्यक परवानग्या घेऊन नियमांचे पालन करावे.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *