पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – महाळुंगे एमआयडीसी परिसरात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने खराबवाडी येथे एका गुप्त गोदामावर धाडसी छापा टाकून एक लाख ३०० रुपयांचे तब्बल ८१ गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त केले.
या प्रकरणी पोलिसांनी सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय गणेश भारत गॅस कार्यालयासमोरील हनुमान मंदिराच्या विरुद्ध बाजूला हा अवैध कारभार सुरू होता. कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा तांत्रिक मानके न पाळता, केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग (पलटी) केली जात होती. गॅस गळती झाल्यास येथे मोठा स्फोट होऊन शेकडो निष्पापांचे जीव गेले असते. त्यामुळे पोलिसांनी वेळीच टाकलेला हा छापा संभाव्य भीषण अनर्थ टाळणारा ठरला आहे.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, महेश खांडे, नितीन लोखंडे, गणेश कोकणे, अमर कदम आणि विशाल गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
—
नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणारे अवैध व्यवसाय आणि जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारे बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध गुन्हे शाखा यापुढेही अशीच कठोर आणि धडक कारवाई सुरू ठेवेल.
– संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड
खराबवाडी, चाकण ः पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ८१ गॅस सिलिंडर जप्त केले.
