पाषाणमध्ये ३७.६ अंशांचा उच्चांक, डुडुळगाव-चिंचवडही उष्णतेच्या विळख्यात

जून उजाडला तरी मान्सूनचा पत्ता नाही; दुपारच्या उन्हाने नागरिक हैराण, पावसाकडे लागल्या नजरा

पुणे –
जून महिन्याची सुरुवात झाली असली तरी पुणे जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. पावसाची प्रतीक्षा वाढत असताना तापमानाने मात्र चांगलीच उसळी घेतली आहे. बुधवारी (दि. ३) जिल्ह्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान ३५ ते ३८ अंशांच्या दरम्यान राहिल्याने नागरिकांना उकाड्याचा तीव्र सामना करावा लागला.
जिल्ह्यात सर्वाधिक तापमान पाषाण येथे ३७.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यापाठोपाठ कोरेगाव पार्कमध्ये ३७.२ अंश, मगरपट्टा आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारच्या वेळी वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पिंपरी-चिंचवड शहरातही उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही. डुडुळगाव येथे ३६.९ अंश सेल्सिअस तर दापोडी येथे ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चिंचवड आणि आंबेगाव परिसरातही पारा ३५.९ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना घामाच्या धारा सहन कराव्या लागल्या. वाढते तापमान आणि दमट वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कामगार वर्ग विशेष त्रस्त असल्याचे दिसून आले.
बारामती, हवेली आणि राजगुरूनगर येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तळेगावमध्ये ३५.४ अंश तर लवळे येथे ३५.३ अंश तापमान राहिले. ग्रामीण भागातही उन्हाचा जोर कायम असल्याने शेतकरी आणि शेतमजुरांना दुपारच्या वेळेत काम करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील तुलनेने थंड भागांमध्ये लवासा येथे ३१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र हा अपवाद वगळता बहुतांश भाग उष्णतेच्या लाटेत भाजून निघाल्याचे चित्र होते.
मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा
हवामान तज्ज्ञांच्या मते, जिल्ह्यातील तापमान अद्याप सरासरीपेक्षा अधिक आहे. मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्याने उकाड्याचा प्रभाव कायम आहे. येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असून त्यानंतरच तापमानात काहीशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
उन्हाच्या वाढत्या झळांमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील उष्ण ठिकाणे
डुडुळगाव – ३६.९ अंश सेल्सिअस
दापोडी – ३६.७ अंश सेल्सिअस
चिंचवड – ३५.९ अंश सेल्सिअस
तळेगाव – ३५.४ अंश सेल्सिअस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *