पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सकाळी सायकलस्वारांचा उत्साह पाहायला मिळणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. स्पर्धा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी वाहतूक पोलीसांनी विशेष नियोजन केले आहे.
रविवार, ७ जून रोजी सकाळी साडेपाच ते साडेदहा या वेळेत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत सांगवी, वाकड आणि देहूरोड वाहतूक विभागाच्या हद्दीतील काही महत्त्वाचे मार्ग बंद राहतील. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्पर्धेचा मार्ग राजीव गांधी ब्रिज, जगताप डेअरी चौक, काळीवाडी फाटा, पुनावळे-औंध बीआरटी रोड, मुकाई चौक आणि अंकुश चौक असा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात सकाळच्या वेळेत वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे.
ढोरे पाटील अंडरपासकडून डी-मार्टच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहतूक राजीव गांधी ब्रिज आणि ब्रेमन चौक मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच ब्रेमन चौकाकडून ढोरे पाटील अंडरपासमार्गे जाणाऱ्या वाहनांनाही पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
शिवार चौक ते काळेवाडी चौक दरम्यान जगताप डेअरी मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनांना जगताप डेअरी अंडरपासमार्गे पर्यायी दिशा देण्यात येणार आहे. कस्पटे चौकातून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनाही पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
काळा खडक परिसरातून डांगे चौकाच्या दिशेने जाणारी वाहतूक डांगे चौक अंडरपास आणि थेरगाव फाटा मार्गे सोडण्यात येणार आहे. बिर्ला हॉस्पिटल परिसरातील वाहनांसाठीही हेच नियोजन लागू राहणार आहे.
भक्ती शक्ती चौकाकडून किवळे ब्रिजच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मुकाई चौकात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या वाहनांना मरके वस्ती चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.
वाहतूक विभागाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.
वाहतूक उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी नागरिकांनी सकाळच्या वेळेत शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवांमधील रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि आपत्कालीन वाहनांना मात्र या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.
रविवारी सकाळी शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावू शकतो. त्यामुळे प्रवासाचे नियोजन आधीच करणे आवश्यक आहे. सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमामुळे शहरात आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जाणार आहे.
रविवारी ‘सायकल डे’चा जल्लोष; शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक वळवली जाणार ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमासाठी विशेष नियोजन; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
