पुण्यातील खांडवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीमध्ये गॅस सिलेंडर बदलताना गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत ३५ वर्षीय पांडुरंग गिट्टे यांचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सिलेंडर बसवताना नोझलमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. आगीच्या संपर्कात येताच मोठा स्फोट झाला आणि आग संपूर्ण घरात पसरली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.
स्फोट इतका शक्तिशाली होता की घरातील बहुतेक वस्तू जळून खाक झाल्या आणि दरवाजे व इतर वस्तूंचे नुकसान झाले. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
