दौंड तालुक्यातील पाटस येथे शुक्रवारी भरदुपारी दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात.

दौंड तालुक्यातील पाटस येथे शुक्रवारी (दि. ५) भरदुपारी दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काष्टी येथील काही युवक आणि पाटस येथील तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीदरम्यान गावठी पिस्तूलातून तीन राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी पाटस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गडदरे कॉम्प्लेक्ससमोर काष्टी येथील काही युवक आले होते. यावेळी त्यांची पाटसमधील काही तरुणांशी शाब्दिक बाचाबाची झाली. वाद वाढत जाऊन दोन्ही गटांमध्ये हाणामारी व दगडफेक सुरू झाली. त्यानंतर काही युवकांनी गावठी पिस्तूल काढून हवेत तसेच समोरासमोर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून रिकामे काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, या ठिकाणी निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी काही वेळापूर्वीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र पोलीस माघारी गेल्यानंतर पुन्हा वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर गोळीबारात झाल्याची चर्चा परिसरात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *