पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात गावठी हातभट्टी आणि देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये आरोपी ज्योती लाला ईराणी (वय ५८, रा. साईबाबानगर, चिंचवड स्टेशन) हिच्याकडून निगडी पोलिसांनी ९०० रुपयांची १० लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. थेरमॅक्स चौक येथे गुन्हे शाखेने कारवाई करत आरोपी मेघराज विठ्ठल पाटील (वय ४०, रा. आकुर्डी) याच्याकडून ८१ हजार रुपयांच्या देशी दारूच्या १०० बाटल्या जप्त केल्या असून आरोपीला अटक केली आहे. तसेच हिंजवडीत दुचाकीवरून दारूची वाहतूक करताना आरोपी घनश्याम अरखीत नायक (वय ४०, रा. माण, हिंजवडी) आणि करणसिंग राधेश्याम सिंग (वय २३) यांच्याकडून ८,००० रुपये किमतीच्या २०० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
तसेच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोस्ती चायनीज सेंटरजवळ आरोपी विश्वजीत विपीनकुमार मैलांगे (वय १९, रा. भांबोली) याच्याकडून ११ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मौजे मोई येथे पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून पोलिसांनी आरोपी दशरथ बलराम थापा (वय ४३) आणि महिंद्रसिंग जयसिंग राठोड (वय ४९, दोघे रा. मोई, खेड) यांच्याकडून ७ हजार ८९० रुपयांचा दारू साठा जप्त केला. तळेगाव एमआयडीसी येथे आरोपी छाया सुरेश राठोड (वय ५७, रा. तळेगाव चाकण रस्ता) हिच्याकडून तीन हजार ६०० रुपयांची ३६ लिटर हातभट्टीची दारू जप्त करून तिला अटक करण्यात आली आहे.
भोसरी एमआयडीसी येथे हॉटेल व्यावसायिक आरोपी ज्ञानेश्वर अनिरुद्ध निर्मळ (वय ४२, रा. मोशी) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन हजार ४९० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. मामुर्डी येथे देहुरोड पोलिसांनी आरोपी जितेंद्र पोपटराव पवार (वय ४३, रा. मामुर्डी) याच्याकडून दोन हजार १६० रुपयांची देशी दारू जप्त केली. पिंपरीतील भाटनगर येथे आरोपी शिला दौलत भाट (वय ६०, रा. भाटनगर) हिच्या पत्राशेडमधून एक हजार १०० रुपयांची १५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. चिंचवड येथील दळवीनगर झोपडपट्टीत रेल्वे पटरीजवळ महिला आरोपी विमल गोवर्धन कटारे (वय ५५) ही ३९० रुपयांची दारू विकताना पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीरपणे दारूची विक्री, वाहतूक व साठा केला होता. या सर्व कारवायांचा पुढील तपास अनुक्रमे निगडी, हिंजवडी, महाळुंगे, तळेगाव, भोसरी, देहुरोड आणि पिंपरी चिंचवड पोलीस ठाणे करीत आहेत.
अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
