पावसाचा जोर वाढणार; पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार सरींची शक्यता; विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

पिंपरी-चिंचवड :
मान्सूनपूर्व पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ७ जून रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव जाणवणार आहे.

८ जून रोजी अकोला, अमरावती, वाशिम, गडचिरोली, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात यलो अलर्ट कायम राहणार आहे.

९ आणि १० जून रोजीही राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो.

दरम्यान, नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी उघड्या जागेत थांबणे टाळावे. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वीज उपकरणांचा वापर सावधगिरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही काढणीस आलेली पिके आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

राज्यातील वाढत्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी पुढील काही दिवस सतर्क राहण्याची गरज असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *