पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून १२ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पिस्तूलही मिळून आले. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मुकाईवस्ती, बावधन येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई बाबासाहेब कुंडलिक पोटे यांनी शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल सुरेश गोणते (वय २४, रा. भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४) दुपारी चार वाजताच्या सुमारास बावधन येथील मुकाईवस्ती भागात एक तरुण संशयास्पद रित्या वावरत असताना पोलिसांना मिळून आला. त्यानुसार राहुल गोणते याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. सध्या शहरात शस्त्रबंदीचा आदेश लागू असतानाही बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी राहूल याला पोलीस उपायुक्तांनी बारा महिन्यांसाठी तडीपार केले असतानाही तो विनापरवाना शहरात आला. तडीपाराच्या आदशाचा भंग केल्याप्रकरणीही त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.
तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक
