रस्त्यावरून गाडी वळवत असताना झालेल्या किरकोळ अपघाताच्या कारणावरून एका व्यक्तीने इलेक्ट्रिशियनची कॉलर पकडून त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (६ जून) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास चरहोली चौक, सिद्धेश्वर वडेवाले जवळ, चरहोली येथे घडली.
याबाबत उमेश मधुकर तांबे (५९, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील सुभाष काळे (३५, चरहोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिग्नलजवळ आपली गाडी उजवीकडे वळवत होते. त्या वेळी झालेल्या किरकोळ अपघातावरून आरोपी निखील काळे याने फिर्यादीची कॉलर पकडली आणि रस्त्यावर पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारला. तसेच त्यांच्या तोंडावर बुक्की मारून गंभीर जखमी केले, ज्यामुळे फिर्यादीला तीन टाके पडले. आरोपीने मारलेला दगड रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षावर लागल्याने रिक्षाची समोरील काच फुटून नुकसान झाले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
