घरगुती वादातून पत्नीला बेदम मारहाण

चिखली गावठाण येथील चिंतामणीनगर परिसरात घरगुती वादातून एका ६५ वर्षीय व्यक्तीने घरात झोपलेल्या आपल्या पत्नीला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (९ जून) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणात पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिचे पती संपत हरीभाऊ भोसले (६५, चिखली, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला फिर्यादी या त्यांच्या राहत्या घरी झोपलेल्या होत्या. त्यावेळी आरोपी पती संपत भोसले याने तिथे येत कोणत्याही कारणाशिवाय जवळ असलेल्या लोखंडी पट्टीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि खांद्यावर जबर मारहाण केली व त्यांना जखमी केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *