अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्याच्या बदल्यात ७० हजारांची मागणी; एसीबीची धडक कारवाई
पिंपरी-चिंचवड :
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणेतीलच एका कर्मचाऱ्याने पैशांच्या मोहापायी कायद्यालाच हरताळ फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बांधकामावर पाडकामाची कारवाई होऊ नये, यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील बीट निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे ही कारवाई महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या पार्किंगमध्येच करण्यात आली. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उमेश अरुण लोढे (वय २८, रा. शिवराज नगर, रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या बीट निरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पिंपळे गुरव परिसरात जागा आहे. त्या ठिकाणी त्यांनी तीन मजली इमारत उभारली आहे. मात्र या बांधकामासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे महापालिकेने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटीस बजावली होती.
या नोटिसीविरोधात तक्रारदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बांधकाम नियमित करण्यासाठी नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तक्रारदारांनी महापालिकेकडे आवश्यक अर्ज दाखल केला. प्रकरण नियमितीकरणासाठी प्रलंबित होते.
दरम्यान, संबंधित भागातील बीट निरीक्षक म्हणून काम पाहणारा उमेश लोढे याने तक्रारदाराशी संपर्क साधला. बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी ७० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली. अन्यथा पाडकामाची कारवाई होईल, असा सूचक इशाराही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांची लाच देण्याची तयारी नव्हती. त्यांनी ९ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सापळा रचण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालय परिसरात पथक तैनात करण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पार्किंगमध्ये आरोपीने तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली.
रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप घातली. उमेश लोढे याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे.
महापालिकेच्या कार्यालय परिसरातच झालेल्या या कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. भ्रष्टाचाराविरोधातील एसीबीच्या या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
