पिंपरी-चिंचवडकरांचे डोळे आकाशाकडे; जून अर्धा सरला तरी पावसाचा पत्ता नाही! उकाड्याने शहर होरपळले; शेतकरी, चाकरमानींसह रेनकोट-छत्री विक्रेतेही मान्सूनच्या प्रतीक्षेत

पिंपरी-चिंचवड :
जून महिना सुरू होऊन १२ दिवस उलटले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड शहरात अजूनही पावसाचा ठोस पत्ता नाही. उलट दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. उष्णता आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षी मान्सूनपूर्व सरींनी दिलासा देणारे शहर यंदा मात्र कडक उन्हात होरपळत आहे. त्यामुळे “पाऊस नेमका कधी येणार?” हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

यंदाच्या उन्हाळ्याने पिंपरी-चिंचवडकरांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. मे महिना संपला. जूनचाही दुसरा आठवडा संपत आला. तरी वातावरणात अपेक्षित बदल झालेला नाही. सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र दिसत आहे. दुपारी बाहेर पडताना नागरिकांना उन्हापासून बचावासाठी टोपी, रुमाल आणि पाण्याच्या बाटल्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

गेल्या वर्षी याच काळात परिस्थिती वेगळी होती. ११ मेपासूनच अवकाळी पावसाच्या सरींनी शहराला दिलासा दिला होता. मान्सून येईपर्यंत अधूनमधून पाऊस बरसत राहिला. त्यामुळे तापमान नियंत्रणात राहिले होते. उन्हाचा त्रासही कमी जाणवत होता. यंदा मात्र अवकाळी पावसाने शहराकडे जवळपास पाठच फिरवली आहे.

मे महिन्यात केवळ एक-दोन हलक्या सरी वगळता शहरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी उष्णतेची तीव्रता कायम राहिली. जूनमध्येही वातावरणात गारवा जाणवत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दिवसभर बाहेर काम करणाऱ्यांना उकाड्याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर आणि हिंजवडी परिसरात दुपारच्या वेळी उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत आहे. सायंकाळीही हवेत गारवा नसल्याने नागरिकांना दिलासा मिळत नाही. अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत उकाडा कायम राहत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

पावसाची प्रतीक्षा केवळ शहरातील नागरिकांनाच नाही. बळीराजाचेही लक्ष आकाशाकडे लागले आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी पावसाची गरज आहे. मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थीही पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

यंदा पावसाच्या प्रतीक्षेत व्यापारी वर्गही आहे. शहरातील रेनकोट, छत्री आणि पावसाळी साहित्य विक्रेत्यांनी दुकानांमध्ये मालाचा साठा करून ठेवला आहे. मात्र पावसाने हजेरी न लावल्याने विक्रीला अद्याप वेग आलेला नाही. घरांवर टाकण्यासाठी लागणाऱ्या ताडपत्री, प्लास्टिक शीट आणि संरक्षण साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांनाही पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मान्सून दाखल होताच बाजारपेठा गजबजतील, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.

हवामानातील अनिश्चितता, वाढता उकाडा आणि लांबलेला मान्सून यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता पहिल्या दमदार सरी कधी बरसतात आणि शहराला कधी दिलासा मिळतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पावसाच्या एका सरीसाठी सध्या पिंपरी-चिंचवड अक्षरशः चातकासारखी वाट पाहताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *