महाळुंगेत अवैध धंदेवाल्यांवर बुलडोझरचा घाव; दारू अड्ड्यांची पाळेमुळेच उपटली सहा ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे जेसीबीने जमीनदोस्त; पोलीस, उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसीची संयुक्त धडक कारवाई

पिंपरी-चिंचवड ः
अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात महाळुंगे पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत थेट बुलडोझर पॅटर्नचा अवलंब केला आहे. महाळुंगे एमआयडीसी परिसरातील सहा ठिकाणी सुरू असलेले अवैध दारू अड्डे आणि त्यासाठी उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून परिसरात पोलीसांचा धाक अधिकच वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध हातभट्टी दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याने परिसरातील संशयित ठिकाणांची माहिती गोळा केली होती.
तपासादरम्यान अनेक ठिकाणी हातभट्टी दारू विक्रीचे व्यवहार अनधिकृत शेड आणि तात्पुरत्या बांधकामांमधून सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या अड्ड्यांमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत असल्याचेही पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी एमआयडीसी प्रशासनाशी समन्वय साधला. राज्य उत्पादन शुल्क विभागालाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. गुरुवारी मोठ्या बंदोबस्तात संयुक्त कारवाई राबविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. दारू विक्रीसाठी वापरले जाणारे अड्डे कायमचे निष्क्रिय करण्यात आले.
कारवाईदरम्यान सिंग्मा चौक, महाळुंगे येथील दुरेश रमेश राठोड आणि लखन जडजा शिंदे यांचे अड्डे जमीनदोस्त करण्यात आले. निघोजे येथील तळवडे ब्रिजजवळ हिंदुस्थान पेट्रोल पंप परिसरातील पुष्पादेवी शांतीलाल जाट यांचे ठिकाणही हटविण्यात आले. कुरुळीतील डी.के. चौक परिसरातील लखन हाजुरीया ठाकुर यांचा अड्डा पाडण्यात आला. तळवडे रोडवरील एचपी पेट्रोल पंपाजवळील उदय अशोक कलाल आणि सुभाषवाडी, निघोजे येथील सुश्मिता बंडु हितेज यांच्या अनधिकृत बांधकामांवरही जेसीबी फिरविण्यात आला.
अवैध दारू विक्रीच्या विरोधातील ही कारवाई पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दिवसे आणि त्यांचे पथक, तसेच एमआयडीसीचे अधिकारी कर्डीले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून मोहीम यशस्वी केली.
गेल्या काही दिवसांपासून महाळुंगे परिसरात अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत. मात्र यावेळी थेट अड्डेच उद्ध्वस्त करण्यात आल्याने हा धक्का अधिक मोठा मानला जात आहे. कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. जेसीबीच्या घणाघाती कारवाईची चर्चा दिवसभर सुरू होती.
हद्दीतील कोणताही अवैध धंदा खपवून घेतला जाणार नाही. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला अधिक धार मिळाल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *