मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकल्पस्थळी पाहणी; ग्रामस्थांचे पुनर्वसन, रोजगार आणि पर्यटन विकासाला नवी दिशा
पुणे – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या विकासाला आता नवी गती मिळणार आहे. धार्मिक वारसा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक सुविधांचा संगम घडविणाऱ्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे या परिसराचे स्वरूपच बदलणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हा प्रकल्प भीमाशंकरच्या सांस्कृतिक ओळखीला जागतिक स्तरावर नवे व्यासपीठ मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला.
भीमाशंकर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र वाढती गर्दी, मर्यादित सुविधा आणि परिसराच्या विकासाची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘हेरिटेज वाडी’ची संकल्पना पुढे आणली आहे. या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनासोबतच सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांचे नियोजनबद्ध पुनर्वसन. मूळ गावापासून अल्प अंतरावर सुमारे १०.५ एकर जागेत नवीन हेरिटेज वाडी विकसित केली जाणार आहे. परिसरातील सुमारे १५० कुटुंबांना दर्जेदार सुविधा असलेल्या नव्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक नातेसंबंध अबाधित ठेवत पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनीही प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगारालाही मोठी चालना मिळणार आहे. ‘लाइव्हलीहुड अपग्रेडेशन’ संकल्पनेअंतर्गत ४० हून अधिक व्यावसायिक युनिट्स उभारण्यात येणार आहेत. स्थानिकांना व्यवसाय, पर्यटन सेवा आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भीमाशंकरची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेरिटेज वाडीमध्ये पारंपरिक वास्तुकलेचा ठसा जपत आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. वारसा प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र, सुस्थित रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विद्युत वाहने, नियोजनबद्ध दुकाने आणि आधुनिक बसस्थानक अशा विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल तसेच वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
धार्मिक महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक विकास यांचा समतोल साधणारा हा प्रकल्प भविष्यात भीमाशंकरची नवी ओळख निर्माण करणार आहे. ‘हेरिटेज वाडी’च्या माध्यमातून भीमाशंकर हे केवळ ज्योतिर्लिंग क्षेत्र न राहता जागतिक दर्जाचे सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
