शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – शेजाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री वेताळ नगर, चिंचवड येथे घडली.
सोमनाथ गौतम वाघमारे (वय ४० वर्षे) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरुणाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी रात्री वेताळ नगर येथील एका इमारतीत एक तरुण नग्न अवस्थेत फिरत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) आला होता. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्‍या तरुणाने स्‍वतःला घरात कोंडून घेतले. पोलीस आणि स्थानिक नागरिक त्याला दरवाजा उघडण्यास सांगत होते, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, सोमनाथ वाघमारे याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याला तातडीने खाली उतरवण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.
​नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
​”शेजाऱ्यांच्या सततच्या त्रासामुळे आणि छळामुळेच सोमनाथने हे टोकाचे पाऊल उचलले आहे,” असा आरोप मृत सोमनाथच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत दोषी शेजाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे रुग्णालयात आणि पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
​पोलिसांकडून समजूत, चौकशी सुरू
​घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने नातेवाईकांशी चर्चा केली. “या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन पोलिसांनी दिले. ​याप्रकरणी पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, शेजाऱ्यांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आत्महत्येमागे नेमके काय कारण होते आणि त्रासाचे स्वरूप काय होते, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *