पोलिसांवर फायरिंग करून पसार झालेल्‍या आरोपी जेरबंद ७० हून अधिक चोरीचे गुन्हे आहेत दाखल; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी-चिंचवड ः
दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून पोलिसांना चकवा देणारा आणि तब्बल ७० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला मुख्य आरोपीला पोलिसांच्‍या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्‍या.
शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. लातूर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
गेल्या महिन्यात १३ मे रोजी आरोपी शेखर जाधव आणि त्याच्या इतर ३ साथीदारांनी फायरिंग करून खुनाचा प्रयत्न केला होता. गुन्हा केल्यापासून हे सर्व आरोपी फरार होते.

रांजणगावच्या उसाच्या शेतात पोलिसांवर गोळीबार
​आरोपींचा माग काढत असताना १६ मे रोजी मुख्य आरोपी शेखर जाधव आणि मुस्तफा (उर्फ भाईजान) हे रांजणगाव (पुणे ग्रामीण) परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस पथक त्यांना पकडण्यासाठी गेले असता, आरोपींनी थेट पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरच गोळीबार केला आणि उसाच्या शेताचा फायदा घेत तिथून पळ काढला. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि गोळीबाराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिघीत रचला सापळा आणि आवळल्या मुसक्‍या!
​१४ जून २०२६ रोजी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास आरोपी शेखर जाधव हा दिघीतील मोझे शाळेसमोरील मोकळ्या मैदानात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या पथकाने तात्काळ या परिसरात सापळा रचला. आरोपी तिथे येताच पोलिसांनी त्‍याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे १ पिस्टल आणि जिवंत काडतूस आढळून आले.

या पथकाने केली कामगिरी
ही कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, उपनिरीक्षक महेश खांडे यांच्‍या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *