सीएनजीचा पुन्हा झटका! वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री

मध्यरात्रीपासून प्रतिकिलो १ रुपयाची वाढ; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये सीएनजीचा दर ९५.७५ रुपये, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता

पिंपरी-चिंचवड :
सर्वसामान्य वाहनचालकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे. सीएनजीच्या दरात मध्यरात्रीपासून प्रतिकिलो एक रुपयाची वाढ झाली असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण आणि तळेगाव परिसरातील सीएनजीचा दर ९५ रुपये ७५ पैसे प्रतिकिलोवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या सलग दरवाढींमुळे सीएनजी शंभरीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

सीएनजी हा पेट्रोल आणि डिझेलला स्वस्त पर्याय मानला जातो. त्यामुळे हजारो रिक्षाचालक, कॅब चालक, स्कूल व्हॅन चालक आणि खासगी वाहनधारकांनी सीएनजीचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र वारंवार होणाऱ्या दरवाढींमुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे.

महिन्याभरात तिसरी वाढ
मे महिन्यात ८ मे रोजी सीएनजीच्या दरात १.५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर २७ मे रोजी पुन्हा २.५० रुपयांनी दर वाढले. आता आणखी १ रुपयाची वाढ होत असल्याने अवघ्या काही आठवड्यांत सीएनजी तब्बल ५ रुपयांनी महागला आहे.

रिक्षा, कॅब आणि स्कूल व्हॅनवर परिणाम
सीएनजी दरवाढीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक आणि कॅब चालकांना बसणार आहे. इंधन खर्च वाढल्याने भाडेवाढीची मागणी पुन्हा जोर धरू शकते. पुण्यातील रिक्षा संघटनांनी यापूर्वीच दरवाढीच्या पार्श्वभूमीवर भाडे पुनर्निर्धारणाची मागणी केली आहे. तसेच स्कूल व्हॅन आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी शुल्कवाढीची मागणी सुरू केली आहे.

महागाईची साखळी आणखी लांबणार
वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी अप्रत्यक्षपणे महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो.

वाहनचालकांमध्ये नाराजी
“पेट्रोल महाग म्हणून सीएनजी घेतला. आता सीएनजीही महिन्याला महागतो आहे. कमाई तेवढीच आणि खर्च वाढतो आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक रिक्षाचालक आणि वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

सीएनजीची किंमत आता ९५.७५ रुपयांवर पोहोचत असताना, पुढील काही महिन्यांत दर शंभरी पार करणार का, याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *