पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी (दि. १५ जून) रोजी झालेल्या विविध कारवायांमध्ये पोलिसांनी सुमारे १.६१ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची अवैध दारू आणि वाहने जप्त केली आहेत. यामध्ये चिंचवड, भोसरी, आकुर्डी आणि चिखली परिसराचा समावेश आहे.
पहिल्या गुन्ह्यात संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी चौक ते सम्राट चौक दरम्यान पोलिसांनी आरोपी शशांक राजेश नारंग (वय २३, रा. चिंचवड) हा त्याच्या ज्युपिटर मोटरसायकलवरून बेकायदेशीरपणे पाच ३०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी बिअरच्या बाटल्या आणि व्हिस्की स्कॉचची बॉटल घेऊन जात असताना मिळून आला. पोलिसांनी मोटरसायकलसह एकूण ९५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुस-या गुन्ह्यात भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिरबाबा दर्गा जवळ, जुने सरकारी हॉस्पिटल रोडवर गुन्हे शाखा युनिट ३ ने कारवाई केली. आरोपी हरी राम वाघमारे (वय ४२) आणि अभिजित प्रकाश गुंडेकर (वय ३२, दोघे रा. लांडेवाडी झोपडपट्टी) हे विनापरवाना दारूची वाहतूक करताना सापडले. त्यांच्याकडून सात हजार ६८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ९६ बाटल्या आणि १० हजार ०८० रुपये किमतीच्या मॅकडॉवेल्स विदेशी दारूच्या ४८ बाटल्या, असा एकूण १७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिस-या गुन्ह्यात निगडी पोलिसांच्या तपास पथकाने विठ्ठल मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यानच्या रस्त्यावर आकुर्डी येथे कारवाई केली. आरोपी अक्षय गोपाल शेट्टी (वय ३४, रा. त्रिवेणीनगर, निगडी) हा त्याच्या होंडा ॲक्टिव्हा गाडीवरून चार हजार रुपये किमतीच्या ‘पावरलाईम पंच’ देशी दारूच्या १०० बाटल्या विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.
चौथ्या कारवाईमध्ये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पाईन चौक सर्व्हिस रोडवर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई केली. आरोपी वसंत अशोक कुंभार (वय ४४, रा. जाधववाडी, चिखली) हा त्याच्या होंडा युनिकॉन दुचाकीवरून दोन हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ५० सीलबंद बाटल्या घेऊन जात असताना सापडला. पोलिसांनी ५० हजार रुपयांची दुचाकी आणि दारू असा एकूण ५२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपी दिव्यांग (हॅन्डीकॅप) असल्याने त्याला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
अवैध दारूधंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच लाखोंचा मुद्देमाल जप्त
