कडजाई माता मंदिरातील चोरीचा छडा; चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम जप्त, तीन गुन्ह्यांचा उलगडा
पिंपरी-चिंचवड :
देवळातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या आणि देवीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत तीन गंभीर गुन्ह्यांचा एकाच वेळी उलगडा केला आहे.
इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची घटना १२ जूनच्या मध्यरात्री घडली होती. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत होता. मंदिरातील श्रद्धेच्या ठिकाणीच चोरट्यांनी हात साफ केल्याने पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने काम सुरू केले. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. अखेर आरोपी चाकण परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून कुणाल बाळू विर (वय २३) आणि लोबो उर्फ सुर्या श्रीमंतहो दास (वय २६) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी चोरीची कबुली दिली. याशिवाय तळेगाव दाभाडे आणि म्हाळुंगे परिसरातील गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे समोर आले.
तपासादरम्यान आरोपींकडून सुमारे १ किलो २५० ग्रॅम वजनाचा देवीचा चांदीचा मुकुट आणि चोरीतील रोख रक्कम जप्त करण्यात आली. एकूण १ लाख २८ हजार ते १ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
तीन गुन्ह्यांचा एकाच वेळी उलगडा
– इंदुरी येथील कडजाई माता मंदिर दानपेटी चोरी
– तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरातील चांदीचा मुकुट चोरी
– दक्षिण म्हाळुंगे परिसरातील घरफोडी
फरार साथीदारांचा शोध सुरू
मुख्य आरोपी अटकेत असले तरी या टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या चोरीमागे आणखी मोठे रॅकेट आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
तपास पथकाचे कौतुक
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त बसवराज तेली, उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक दिपक खरात आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कमी वेळेत गुन्ह्याचा छडा लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
श्रद्धास्थानांवर डल्ला मारणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी दिलेला हा दणका सध्या तळेगाव आणि मावळ परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
