महाराष्ट्रात मान्सूनची पुढची वाट खडतरच! पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटा; मुंबईकरांना पावसासाठी आणखी प्रतीक्षा

मुंबई : राज्यातील नागरिकांना मान्सूनच्या जोरदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल गेल्या आठवडाभरापासून मंदावली असून पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होत असून जून महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती ठप्प झाली असून कोकणातील हर्णे ते सोलापूर या पट्ट्यापर्यंतच मान्सून स्थिरावल्याचे दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 25 जूननंतर मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

उष्णतेच्या लाटांचा इशारा

हवामान विभागाने 19 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटा आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या भागांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

18 आणि 19 जून रोजीही कोकण किनारपट्टीसह मुंबई महानगर प्रदेशात उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मान्सूनची गती का मंदावली?

हवामान तज्ज्ञांच्या मते, समुद्रातील आर्द्रतेचा अभाव हे मान्सून मंदावण्याचे प्रमुख कारण नसून वातावरणाच्या वरच्या स्तरावरील वाऱ्यांच्या असामान्य रचनेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिमी जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिक दक्षिणेकडे सरकल्यामुळे मान्सूनला गती देणाऱ्या वाऱ्यांवर परिणाम झाला आहे. परिणामी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुरेशी आर्द्रता उपलब्ध असूनही मान्सूनचा वेग कमी झाला आहे.

याशिवाय, प्रशांत महासागरात विकसित होत असलेल्या अल निनोचा परिणामही मान्सूनवर होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जून महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत पाऊस कधी?

मुंबईकरांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जोरदार पाऊस कधी सुरू होणार? हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूनची रेषा पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने मुंबईत व्यापक पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

25 जून ते 1 जुलै दरम्यान मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता असून या काळात मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते. त्यानंतरच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

मान्सूनच्या प्रगतीला झालेला विलंब आणि कमी पावसाचा अंदाज यामुळे शेतकरी वर्गामध्येही चिंता वाढू लागली आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या अनेक ठिकाणी पावसाअभावी रखडल्या असून पुढील आठवडाभरात मान्सूनला गती मिळाली नाही तर त्याचा परिणाम शेती क्षेत्रावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात उष्णता आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *