बैल गेला अन् संसार अडला! पेरणीसाठी पत्नीने खांद्यावर घेतले जू; व्हिडीओ व्हायरल होताच शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी

लातूर

लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि समाजातील विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विजेचा धक्का बसून बैल दगावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पेरणीसाठी स्वतःच्या पत्नीला जूला जुंपून शेती करावी लागल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ राज्यभर चर्चेचा विषय ठरल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला नव्या बैलजोडीची मदत करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील एका गावातील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा बैल काही दिवसांपूर्वी वीज कोसळल्याने दगावला. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या गायकवाड कुटुंबाकडे नवीन बैल खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे नव्हते. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने पेरणीची वेळ हातातून जाऊ नये म्हणून त्यांनी एक बैल आणि दुसऱ्या बाजूला पत्नीला जूला जुंपून शेत नांगरण्याचा निर्णय घेतला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या दारुण परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी तातडीने मदतीची मागणी केली. व्हिडीओ राज्यभर पोहोचल्यानंतर लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणांना मदतीच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर विविध माध्यमांतून मदत उभी राहिली आणि शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना बैलजोडी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पेरणीच्या कामाला मोठा दिलासा मिळाला आहे.

बैलजोडी मिळाल्यानंतर गायकवाड कुटुंबाने मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. मात्र, ही घटना राज्यातील अनेक शेतकरी अजूनही मूलभूत साधनांच्या अभावामुळे किती कठीण परिस्थितीत शेती करत आहेत, याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, तसेच शेतीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बैल दगावल्याने पत्नीला जूला जुंपण्याची वेळ आलेल्या या शेतकरी कुटुंबाचा संघर्ष अखेर समाजाच्या संवेदनशीलतेमुळे आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे काहीसा हलका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *