पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – रस्त्यावरील फळविक्रीच्या हातगाड्यांवर कायदेशीर कारवाई करत असताना एका व्यक्तीने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १८ जून) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जिजामाता चौक ते स्टेशन रोडवरील स्लीपवेल दुकानाचे समोर तळेगाव दाभाडे येथे घडली.
या प्रकरणात साहिल मंगेश दाभाडे (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) यांनी गुरुवारी (दि. १८ जून) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश दिलीप जगदाळे (वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष, रा. हॉचींग शाळेजवळ, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत असून ते आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी आरोपी राजेश जगदाळे याने तिथे येऊन “तुमचे काम बंद करा, तुमच्याकडे आदेश आहे का?” असे म्हणत फिर्यादी व त्यांच्या तीन सहकाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी करत कर्मचाऱ्यांना तिथून हाकलून दिले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
सरकारी कामात अडथळा आणत पालिकेच्या अतिक्रमण कर्मचाऱ्यांना मारहाण
