Delhi-रेल्वे स्टेशन व्यवस्थापन अधिक सक्षम होणार; स्टेशन मास्टर्सना अधिक अधिकार देण्याच्या प्रस्तावांचा आढावा

नवी दिल्ली(delhi) : देशातील रेल्वे स्थानकांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैशव यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत स्टेशन मास्टर्सना अधिक अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यापक आराखड्याचा आढावा घेण्यात आला.

भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये सुरक्षित, अधिक कार्यक्षम आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून सेवा पुरविण्यासाठी स्टेशन मास्टर्सना सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. स्थानक पातळीवर त्वरित निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे, प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करणे आणि स्थानक व्यवस्थापन अधिक प्रभावी बनविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीत स्टेशन मास्टर्सच्या भूमिकेला अधिक बळकटी देण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये प्रशासकीय आणि परिचालन अधिकार वाढविणे, पदोन्नतीच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे तसेच व्यवस्थापनाच्या उच्च पदांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पष्ट करिअर मार्ग विकसित करण्याच्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.

याशिवाय स्थानकांची पायाभूत सुविधा, कर्मचारी कार्यालये, रेल्वे वसाहती आणि इतर संबंधित सुविधांवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी स्टेशन मास्टर्सना अधिक अधिकार देण्यावरही भर देण्यात आला. यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या जलद गतीने सोडविणे शक्य होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.

रेल्वे प्रशासनाच्या मते, या उपाययोजनांमुळे स्थानक व्यवस्थापन अधिक गतिमान होईल, प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील आणि भारतीय रेल्वेची सेवा गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *