Omkareshwar-जागतिक सिकल सेल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती;

ओंकारेश्वर(omkareshwar) : जागतिक सिकल सेल दिनानिमित्त मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी देशभरात सिकल सेल आजाराच्या प्रतिबंध आणि निदानासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचे कौतुक करत, नवजात बालकांपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या सुमारे ७ कोटी नागरिकांची तपासणी करण्यात आल्याचे सांगितले.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “७ कोटी लोकांचे सिकल सेल तपासणीसाठी स्क्रीनिंग करणे ही छोटी गोष्ट नाही. अनुवांशिक आजारांच्या तपासणीसाठी राबविण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.”

सिकल सेल आजाराच्या निर्मूलनासाठी केंद्र सरकारने देशभर विशेष मोहीम सुरू केली असून विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये जनजागृती, तपासणी आणि उपचारांवर भर दिला जात आहे. या मोहिमेच्या माध्यमातून लाखो नागरिकांची तपासणी करण्यात आली असून लवकर निदान आणि योग्य उपचार उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रपतींनी सिकल सेल आजाराविरोधातील लढ्यात आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि विविध शासकीय यंत्रणांच्या योगदानाचेही कौतुक केले. २०४७ पर्यंत भारतातून सिकल सेल रोगाचे निर्मूलन करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला विविध केंद्रीय मंत्री, राज्य सरकारचे प्रतिनिधी, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *