पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. २१ जून) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चिखली येथील भाजी मंडई रोड व साने चौक येथे घडली.
विनायक उर्फ बाबू राजू ननावरे (वय २४, रा. साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ धाईजे (वय २१, रा. अंठाजनगर, निगडी), शिवशंकर श्रीमंगल (वय २०, रा. चाकण) आणि त्यांच्या इतर दोन अनोळखी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सिद्धार्थ आणि शिवशंकर या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्यांच्या दोन अनोळखी मित्रांनी फिर्यादीला जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा मित्र ऋतीक कसाळकर याला कानाखाली मारली. आरोपींनी तिथून निघून जाताना कोयते हवेत उगारून लोकांना “समोर याल तर एकेकाला बघून घेईल” अशी धमकी देऊन परिसरात दहशत माजवली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार
