पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – लिंक्डइन सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एका तरुणाशी संपर्क साधून नामवंत कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पावणेदोन लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १९ ते ३० नोव्हेंबर २०२५ या दरम्यान सांगवी येथे घडली. याप्रकरणी २१ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पीडित तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पे पाल कंपनीचा डायरेक्टर गौरव शर्मा असे भासवणारा एक अनोळखी व्यक्ती, व्हॉट्सॲप नंबर धारक आणि करुर वैश्य बँकेचा आर. कुमार एस. नावाने असलेल्या अकाऊंट धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लिंक्डइन आणि व्हॉट्सॲपवरून फिर्यादीशी संपर्क साधला. त्यांना पे पाल कंपनीमध्ये जॉब मिळवून देण्यासाठी प्रभावी जॉब प्रोफाइल बनवून देण्याचे आमिष दाखवले आणि खोटे इंटरव्यू घेऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने, “मला पूर्वी विप्रो कंपनीने भारतात डायरेक्टर मीटिंगसाठी बोलावून जॉबवरून काढून टाकल्याने राहण्यासाठी व दैनंदिन कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची खूप आवश्यकता आहे,” असे खोटे सांगून फिर्यादीचा विश्वासघात केला. आरोपीने फिर्यादीला एकूण १ लाख ७२ हजार २०० रुपये करुर वैश्य बँकेच्या खात्यावर ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून पावणे दोन लाखांची फसवणूक
