पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – जागेच्या साफसफाईवरून झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून नातेवाईकांनी मिळून एका रिक्षाचालकाला लाकडी दांडक्याने आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २० जून) रात्री ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या सुमारास, देहूरोड येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय, चिंचोली येथे घडली.
प्रदीप भीमराव गायकवाड (वय ४६, रा. चिंचोली, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे (वय २७), प्रणव मिलिंद चोपडे (वय २२), अनुराग सूर्यकांत चोपडे (वय २१) आणि अक्षय अनिल चोपडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी प्रदीप यांनी त्यांच्या जागेत साफसफाई केली होती, त्यावेळी त्यांच्यात आणि आरोपींमध्ये त्या जागेवरून बाचाबाची झाली होती. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे फिर्यादी यांनी त्यावेळी आरोपींच्या विरुद्ध तक्रार दिली नव्हती. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी एकत्र येत फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि कुऱ्हाडीने मारून जबर जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून रिक्षाचालकाला कुऱ्हाडीने मारहाण
